चाफे- गणपतीपुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार; लवकरच कामाला सुरुवात 

रत्नागिरी:- न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने चाफे-गणपतीपुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांनी रस्त्याच्या रुंदीकरणात जाणारी जागा अधिग्रहित केल्याशिवाय रूंदीकरण करू नये. तोपर्यंत या कामाला स्थगिती देण्याची विनंती केली होती. सुमारे 27 कोटी रुपये खर्चुन हा रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यारंभ आदेशही दिले होते. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने प्रत्यक्षात कामाला सुरूवात करता येत नव्हती.

सार्वजनिक कामासंदर्भात स्थगिती देता येत नाही अशी तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाचे वकील निलांजन नाचणकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या जागा या रस्ता कामात अधिग्रहित होणार नसल्याचे हमीपत्रही न्यायालयाला सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने जागा जाणार नसल्याने रस्ता कामाला स्थगिती देण्याचा ग्रामस्थांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.प्रमुख जिल्हा मार्ग क्र.25 वरील चाफे ते गणपतीपुळे हा साडेदहा कि.मी.चा रस्ता करण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.1 कडून सुरू झाली. आशियाई विकास बँकेच्या फंडातून केंद्र शासनाच्या रस्ता निकषानुसार (आयआरसी मानक) होणार आहे. या रस्त्याच्या आजूबाजूची जागा रस्ता रूंदीकरणात जाणार असल्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी सहदिवाणी न्यायालयात (वरिष्ठ स्तर) धाव घेतली. या रस्त्याचे रूंदीकरण झाल्यानंतर आमच्या जागा जाणार असून त्या कायदेशीररित्या अधिग्रहित झाल्याशिवाय रस्त्याचे काम होवू नये, यासाठी स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती.