रत्नागिरी:- तालुक्यातील चाफे-गणपतीपुळे रस्ता रुंदीकरणाला विरोध वाढत आहे. संबंधित लोकांशी चर्चा करुन त्यावर मार्ग काढावा अशा सुचना कोकण विभागिय मुख्य अभियंता प्रकाश इंगोले यांनी रत्नागिरीच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
मुख्य अभियंता इंगोले हे शनिवारी (ता. 30) रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतील चाफे-गणपतीपुळे आणि दाभोळे या दोन मार्गांची पाहणी केली. या दोन्ही मार्गांचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. या कामाला स्थानिक शेतकर्यांचा विरोध वाढत आहे. याबाबत स्थानिकांनी खासदार सुनिल तटकरे यांनाही साकडे घातले होते. रस्ता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यावर श्री. इंगोले यांनी जिल्ह्यातील अधिकार्यांना सुचना दिलेल्या आहेत. आतापर्यंत बांधकाम विभागाकडून विरोध करणार्या लोकांशी संवाद साधण्यासाठी पावले उचलली नव्हती. आता त्या लोकांशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यावर भर दिला जाणार आहे. यापुर्वी रस्त्यासाठी भुसंपादन केलेल्या जागेचे पैसे शासनाकडू अजुनही दिलेले नाहीत, असा पवित्रा घेण्यात आला आहे. हा प्रश्न सामाजस्यांने कसा सोडवता येईल हे पहा अशा सुचना श्री. इंगोले यांनी दिलेल्या आहेत.









