रत्नागिरी:- अहवाल कोरोना बाधित आला तर विलगीकरणात (क्वारंटाईन) रहावे लागण्याच्या भितीने आरटीपीसीआरसह सर्वच चाचण्यांकडील नागरिकांचा कल कमी होऊ लागला आहे. गणेशोत्सवानंतर आरटीपीसीआरचा ठरवून दिलेला ६०-४० चा रेशोही बिघडला आहे. तसेच अॅण्टीजेनचा अहवाल त्वरीत होत असल्यामुळे तो पर्याय अनेकांकडून निवडला जात आहे. तिसर्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना चाचण्यांकडे होणारे दुर्लक्ष आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरु शकते.
दुसर्या लाटेचा जोर ओसरत असून जिल्ह्यात दररोज होणार्या चाचण्यांमध्ये ५० ते ८० च्या बाधित सापडत आहेत. जुन महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या सात ते आठ हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जास्तीत जास्त बाधित शोधून काढण्यावर आरोग्य यंत्रणेने भर दिला जातो. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर अडीच टक्केपर्यंत खाली आला आहे. तसेच बरे होण्याचा दरही ९५.५६ टक्केपर्यंत आहे. मृत्यूचा सरासरी दर ३ टक्केपेक्षा अधिक असला तरीही दैनंदिन दर १ टक्का आहे. कोरोनाची सध्याची स्थिती नियंत्रणा असली तरीही भविष्यात धोका निर्माण होण्याची भिती आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. गणेशोत्सवात चाचण्यांची संख्या अडीच ते सव्वातीन हजारापर्यंत टिकून राहीली आहे. त्यातही कोरोना योग्य निदान करणार्या आरटीपीसीआर चाचणीकडील कल कमी होऊ लागला आहे. शासनाच्या निकषानुसार एकुण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरच्या ६० तर अॅण्टीजेनच्या ४० टक्के रेशो आवश्यक आहे. पण जिल्ह्यात आरटीपीसीआरचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गणशोत्सवात तर चाळीस टक्केपेक्षाही खाली आले होते. निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना चाचणीकडील लोकांचा कल कमी झाला आहे. लक्षणे नसतानाही बाधित अहवाल आला तर पंधरा दिवस क्वारंटाईन होण्याची भिती अनेकांच्या मनात आहे. काहीजणं अॅण्टीजेन चाचणी करतात. पॉझिटीव्हीटी दर पाच टक्केवर गेला तर पुन्हा निर्बंध लागू होण्याची भिती आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे.









