चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकले; किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळ आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढचे ३ तास महत्त्वाचे आहेत.

काल रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीभागाला प्रभावित करून तौक्ते चक्रीवादळ हे आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून यामुळे वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढच्या 3 तासांत रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. चक्रीवादळामुळे आज लसीकरण बंद करण्यात आलं आहे.