ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार गेमचेंजर: उपमुख्यमंत्री शिंदे

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सागरी महामार्गावर नऊ खाडीपूल मंजूर झाले आहेत. मुंबई ते सिंधुदूर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा डिपीआरचे काम सुरु असून हा रस्ता गेमचेंजर ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरीत आयोजित कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत त्यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान ग्रीनफिल्ड रस्त्याच्या डिपीआरचे काम सुरु आहे. हा रस्ता सागरी महामार्गा आणि मुंबई गोवा महामार्गाला अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड म्हणून उपयोगात येणार आहे. हा मार्ग झाल्यावर पाच तासात प्रवास होणार आहे. सागरी महामार्गासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील खाड्यांवर नऊ पूल मंजूर झाले आहेत. जयगड खाडीवर तर जवळपास पंधराशे कोटींचा केबल पूल होणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्ष रखडला असून, हा रस्ता करताना काही ठेकेदार व्यवस्थित भेटले नाही. काहींनी चांगले काम केल्याचेही त्यांनी सांगितले. आपले दुर्देव की रस्ता वेळेत पूर्ण झाला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील काही वर्षात रत्नागिरीचा पर्यटन विकास चांगला झाला आहे. यासाठी नवनवीन उपक्रम राबवले गेले पाहीजेत, शासन सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कोकणातील पत्रकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच त्यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पत्रकारांसाठीची जांभेकर पुरस्कार योजना व पत्रकार कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच यावर अंमलबजावणी होईल असे पाहिले जाईल असेही ना. शिंदे यांनी सांगितले.