ग्रामीण भागात वाढते रुग्ण; कोरोनामुक्त गावांच्या संख्येत घट

रत्नागिरी:-ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने दररोज नवनवीन गावात एखादा बाधित सापडत आहेत. जिल्ह्यात जुलै पहिल्या आठवड्यात एक हजारहून अधिक गावे कोरोनामुक्त होती; मात्र पंधरा दिवसात त्यात घट झाली असून सध्या 849 गावे कोरोनामुक्त आहेत.

माझे गाव माझी जबाबदारी या मोहीमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी कोरोना चाचण्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली. दुसर्‍या लाटेमध्ये कोरोनाचे बाधित मोठ्याप्रमाणात वाढले. जिल्ह्यातील पॉझिटीव्हीटी रेटही कमी झालेला नाही. गावपातळीवरील बाधितांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कार्यवाही सुरु झाली. दिवसाला पाच ते सात हजाराच्या दरम्यान चाचण्या होऊ लागल्या. याही परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनामुक्त राहीली आहेत. हा आकडा कमी-अधिक होत आहे. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 534 महसूली गावे आहेत. त्यातील एकही बाधित न सापडणार्‍या गावांची संख्या 849 आहे. तसेच 0 ते 15 बाधित असलेली 477 गावे, 16 ते 24 पर्यंत बाधित असलेली 26 तर पंचवीसपेक्षा अधिक बाधित असलेल्या गावांची संख्या 18 आहे. एकाच अधिक बाधित सापडणार्‍या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. जुलैच्या सुरुवातीला एकही गाव बाधित नसलेल्या गावांची संख्या एक हजाराच्यावर होती; मात्र त्यात मोठी घट झाली आहे. राजापूर तालुक्यात पंधरापेक्षा अधिक सापडलेल्या गावांची संख्या सर्वाधिक 103 आहे. त्यापाठोपाठ चिपळूण, खेड, दापोली आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो. 25 पेक्षा अधिक गावे बाधित असलेली गावे मोजकीच आहेत. लांजा, खेड आणि मंडणगड तालुक्यात उद्रेकजन्य स्थिती असलेली गावे कमी आहेत. जिल्हा प्रशासनाने अधिक बाधित असलेली गावे उद्रेकजन्य म्हणून घोषीत करुन तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. त्यामुळे कोरोना बाधित नियंत्रीत ठेवणे शक्य होत आहे.