Friday, October 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्या

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्या

सामूहिक अनुदानाचीही मागणी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे थकीत मानधन दिवाळीपूर्वी अदा करावे, तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना केंद्रचालकांसाठी सामूहिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनाची तरतूद १६ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली नाही. तसेच मानधन कशा पद्धतीने द्यावे आणि कोणत्या निधीतून द्यावे, याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जुलै २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील मानधन थकीत असून, संबंधित संगणक परिचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवाळी सण जवळ आल्याने प्रत्येक कुटुंबाला घरगुती खरेदी, सणासुदीचा खर्च, मुलांचे शैक्षणिक खर्च आणि इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक नियोजन करावे लागते. मात्र, मानधन वेळेत मिळत नसल्याने संगणक परिचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील थकीत मानधन दिवाळीपूर्वी मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक तुटपुंज्या मानधनावर विविध कामे करीत असून, ते मानधनही वेळेत मिळत नसल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना केंद्रचालकांसाठी सामूहिक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचित करावे, जेणेकरून संगणक परिचालकांना सण आनंदात साजरा करता येईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष श्री. हरिशचंद्र महादेव वेदरे, उपाध्यक्ष श्री. संतोष शशिकांत वाघ, उपाध्यक्षा सौ. पूजा देवेंद्र गोडाळकर आणि सचिव श्री. समीर श्रीपाद गोडाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागणीची माहिती उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार किरणजी सामंत यांनाही देण्यात आली आहे.