ग्रामकृतिदलाच्या रूपाने आमच्यासाठी देवच धावून आला

संतोष साळवी; मुंबईत राहून चाकरमान्यांच्या घरी गणेशोत्सव

रत्नागिरी:- कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गावाकडे गणेशोत्सवासाठी चौदा दिवस क्वारंटाईन होणे नोकरीमुळे शक्य नव्हते. मनात रुखरुख होती ती प्रथेप्रमाणे गावाकडील जुन्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करता येणार नसल्याची. मात्र हातिस-टेंब्येतील ग्रामकृतीदल मदतीला धावून आले. गावाकडून निरोप आला….आम्ही तुमच्या घरी गणपतीची पुजा-अर्चा करतो. तेव्हा मी निर्धास्त झालो, अशी प्रतिक्रिया टेंब्ये येथील मुंबईस्थित चाकरमानी संतोष साळवी यांनी बोलताना व्यक्त केली.

कोरोनामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणार्‍या चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यावरुन सुरवातीला संभ्रम होता. ग्रामपंचायतीने चौदा दिवस विलगीकरणात ठेवण्याचा निर्धार केला होता. तशा सुचनाही ग्रामस्थांना दिल्या. मात्र शासनाने दहा दिवसांचे क्वांरटाईन करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार काही चाकरमानी गावाकडे परतले. पण नोकरी, व्यावसायात असलेले अनेक चाकरमानी विलगीकरणाच्या अटीमुळे गावाकडे येऊ शकत नव्हते. एवढी सुट्टी मिळणे अशक्य होते. त्यांची अडचण हातिस, टेब्ये ग्रामकृतीदलाच्या प्रमुख सरपंच कांचन नागरवेकर यांनी सोडवली. चाकरमान्यांच्या बंद घरात गणपती आणण्याची जबाबदारी ग्रामकृतीदलाने स्विकारली आणि ती पारही पाडली. आठ चाकरमान्यांच्या घरी ग्रामकृतीदलाने गणपतीची आराधना सुरु केली आहे. पुजा-अर्चा, आरत्याही तेच करत आहेत.

याबाबत मुंबईतील चाकरमानी संतोष साळवी म्हणाले, गणपतीला दरवर्षी आम्ही गावाकडील घरी येतो. इतरवेळी आमचे घर बंद असते. कोविडमुळे चौदा दिवस क्वारंटाईन आवश्यक केल्याने तेवढी सुट्टी मिळणे शक्य नव्हते. पती-पत्नी नोकरीला असल्याने गणपती आणायचा कसा हा प्रश्‍नच होता. याबाबत गावातील बंधूबरोबर बोललो. त्याचवेळी ग्रामस्थांचीही मिटींग झालेली होती. मुंबईकरांना सहकार्य करण्याचा निर्णय त्यात ग्रामकृतीदलाने घेतला होता. त्यानुसार आम्ही तुमच्या घरी गणपती आणू असे आश्‍वासन दिले. गणेश आगमनापुर्वी आमचे बंद घराची साफसफाईही केली. मकर बांधले आणि गणपतीची मुर्तीही आणली. मनोभावे पुजा अर्चा करुन आरतीही केली. सध्या आमचा गणपती दीड दिवसांचा आहे. त्यामुळे दिड दिवस घर आमचे उघडे ठेवण्यात आले होते. आमच्या अनुपस्थितीत गणरायाची आराधना केल्यामुळे मी निर्धास्त झालो. पिढीजात प्रथेप्रमाणे कोरोनाकाळात आम्ही मुंबईतून येणे शक्य नव्हते. तरीही ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे प्रथा कायम राहीली.

मुंबईकर चाकरमान्यांची उत्तमरितीने व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी चाकरमान्यांच्या सुचनेवरुन गावातील आठ घरांमध्ये ग्रामकृतीदलाने गणपतीपची प्रतिष्ठापना केली. -कांचन नागवेकर, सरपंच