राजापूर आंगले परिसरातील घटना
राजापूर:- राजापूर तालुक्यातील आंगले परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री बिबट्याने वाडीवस्तीतील एका गोठ्यात घुसून गाय ठार केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आंगले परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार असून ते जोडीने फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हे बिबटे दिवसा घरांच्या जवळ येत पाळीव कोंबड्यांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढलेला आहे.
अलीकडे आंगले सरवणकरवाडी येथील धाकटा सरवणकर यांच्या घराजवळील गोठ्यात बिबट्याने घुसखोरी करत गाय पकडली. गोठ्यातील इतर जनावरांच्या हंबरड्यामुळे सरवणकर यांनी तेथे धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला; मात्र गाय ठार झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
वाडीवस्ती परिसरात कुत्रे व पाळीव जनावरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रात्री घराबाहेर पडण्यास तसेच दिवसा जंगल परिसरात जाण्यास नागरिक धजावत नसल्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पिंजरा लावावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.









