रत्नागिरीः– हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहन खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या एकाच दिवशी झालेल्या विक्रमी वाहन नोंदणीमुळे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तब्बल अडीच कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर या दिवशी तब्बल ६७३ वाहनांची झाली नोंदणी झाली आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी घरी आणण्याच्या परंपरेमुळे रत्नागिरीकरांनी शोरूम्समध्ये मोठी गर्दी केली होती. आरटीओच्या आकडेवारीनुसार, या दिवशी एकूण ६७३ वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये दुचाकींपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे.
केवळ नवीन गाड्यांची खरेदीच नाही, तर आपल्या आवडीचा किंवा ‘व्हीआयपी’ नंबर मिळवण्यासाठीही वाहनधारकांनी हात सैल सोडला. एकूण ८९ वाहनधारकांनी आकर्षक नंबरसाठी विशेष पसंती दिली, ज्यातून आरटीओला देखील ९ लाख ३१ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
वाहनधारकांना वेळेत नोंदणी मिळावी आणि सणाच्या दिवशी त्रास होऊ नये यासाठी रत्नागिरी आरटीओने विशेष नियोजन केले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले की, वाहन नोंदणी वेळेत व्हावी आणि वाहनधारकांना गाड्या लवकर मिळाव्यात यासाठी कार्यालयाने विशेष मेहनत घेतली होती. यातून शासनाला २ कोटी ३९ लाख ६० हजार ८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
रत्नागिरीकरांनी यंदा सोने-चांदी खरेदीसोबतच वाहन खरेदीलाही मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. गुढी पाडव्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आरटीओ कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी या प्रक्रियेसाठी कार्यरत होते, ज्यामुळे शेकडो कुटुंबांना पाडव्याच्या दिवशी नवीन गाडीची चावी हाती मिळाली.









