आ.आदित्य ठाकरे यांचा घणाघात
रत्नागिरी:- खोके सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. शासनाचा एकही निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. याचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष, उद्योग क्षेत्राबद्दल येथे येवून काय बोलायचे ? राज्यात एक मराठी उद्योजक उभा राहिला नाही. उलट राज्यात येवू घातलेले मोठे प्रकल्प गुजरातला पाठविण्याचे काम खोके सरकारने केले आहे. हे सरकार महाराष्ट्राचे नसून गुजरातच्या हितासाठी लादण्यात आले आहे. असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते , आ. आदित्य ठाकरे यांनी केले.
कोकणातील खळ्यात सध्या भात झोडणीचे काम वेगात सुरु आहे. शेतकरी आपल्या खळ्यात भात झोडत असताना तेथेच त्यांची थेट भेट घेण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरे ‘खळा’ बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी रत्नागिरीच्या दौर्यावर आले होते. करबुडे येथे आयोजित ‘खळा’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, महिला तालुकाप्रमुख सौ.साक्षी रावणंग, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
भगवे झेंडयांनी करबुडे परिसर सजला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजीतच आ.आदित्य ठाकरे यांचे ‘खळा’बैठकीसाठी आगमन झाले. यावेळी त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आ. ठाकरे यांनी राज्य सरकारसह पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या उद्योग मंत्रालयावर टिकेची झोड उठविली.
आ.ठाकरे म्हणाले, कोकणाने शिवसेनेला पुर्वीपासूनच प्रेम दिले आहे. मी जेव्हा कोकणात येतो तेव्हा येथे सण साजरा होत असतो. हे प्रेम असेच कायम राहू देत.खळ्यातील संवाद हा कौटूंबिक संवाद असतो.मी तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे खळ्यात तुुमच्या भेटीसाठी आलो आहे. आज तुम्ही दिलेल्या प्रमाने मी भारावून गेलो आहे. आता विधान परिषदेच्या पदविधर मतदार संघात आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे. या मतदार संघातून उबाठाचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास आ.ठाकरे यांनी व्यक्त केले.
खोके सरकारने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहे. एक नवा उद्योग राज्यात आला नाही. येणारे उद्योग खोके सरकारने गुजरातला पाठविले आहे. ३१ डिसेंबरला हे सरकार जाणार असून यापुढील विधानसभा निवडणूकीत आपलेच सरकार येणार असल्याचा दावा आ.आदित्य ठाकरे यांनी केला.