रत्नागिरी:- गारठवऱ्या वाऱ्यानी मासेमारीवर परिणाम झाला आहे. गरठवणाऱ्या वार्यांमुळे मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येणारा मासा गायब झाला आहे. मासळी गायब झाल्याने बहुसंख्य मच्छीमार नौका बंदरावरच उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. काही प्रमाणात मिळणाऱ्या मासळीसाठी नौका खोल समुद्रात जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 3 हजार 519 यांत्रिकी आणि 442 बिगर यांत्रिकी मच्छीमार नौका आहेत. जिल्ह्याच्या 167 कि.मी. समुद्रात या नौका मासेमारी करतात. पर्ससीननेट मासेमारीवर 1 जानेवारीपासून बंदी आहे. त्यामुळे या नौकाही बंदरातच उभ्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून थंडगार वारे सुटले आहेत. याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे.
पारंपरिक मासेमारी करणार्या मच्छीमार नौकांना मासिक 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. यामध्ये इंधन, खलाशी-तांडेलांचा आठवड्याचा पगार, नौकेत भरावे लागणारे जिन्नस आदींसाठी हा खर्च होतो. हाच खर्च पर्ससीननेट मच्छीमार नौकांसाठी 12 ते 13 लाख रुपयांपर्यंत असतो. समुद्रात मासाच मिळत नसल्याने बंदी काळात चोरीछुपे मासेमारी करण्यासाठी जाणार्या नौकाही बंदरातच उभ्या आहेत.
समुद्रात थंड वारे वाहत आहेत. अशा वातावरणात समुद्रातील मासा पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याऐवजी तो समुद्राच्या तळाशी जातो. त्यामुळे जाळ्यांमध्ये मासा सापडत नाही. अशा वातावरणात मासा मिळणे कठीण जात असल्याचा अनुभव असल्याने बहुसंख्य नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवल्या गेलेल्या नाहीत. किमान नौकेसाठी होणारा खर्चतरी बचावेल या आशेने नौका बंदरातच उभ्या करून ठेवल्या जात आहेत.
मासळीची आवक कमी असल्याने मच्छीचे दर वधारलेलेच आहेत. रत्नागिरी समुद्रात मिळणारी मासळी मोठ्या प्रमाणात केरळकडे पाठवली जाते. केरळमध्ये हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने मच्छीच्या वेगवेगळ्या डीश बनतात त्यासाठी रत्नागिरीतूनही नव्हे तर गोवा, गुजरात, कर्नाटकची मासळीही केरळकडे जाते. परंतु, रत्नागिरीचा मासळी मिळण्याचा ‘रिपोर्ट’ फारच बेताचा असल्याने केरळकडे जाणारे मासळीचे प्रमाणही गेल्या चार दिवसांपासून फारच कमी झाले आहे. आणखी चार दिवस असेच थंड वारे वाहतील, असा अंदाज मच्छीमारांकडून वर्तवला जात आहे.









