Friday, September 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

देवरुख-रत्नागिरी मार्गावरील घटना

रत्नागिरी:- देवरुख-रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना घडली. रस्त्यात अचानक आलेल्या एका धिप्पाड गवा रेड्याने धावत्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुण देवरुख-साडवली परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून देवरुख-रत्नागिरी मार्गावरून जात होता. आंबवजवळ येताच जंगलातून अचानक एक गवा रस्त्यावर धावत आला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही. गव्याने मारलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल हवेत उडून रस्त्याकडेला फेकली गेली.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असून त्याला डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उपस्थितांच्या मदतीने त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ​घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. तसेच वन्यजीव विभागालाही यासंदर्भात सुचित करण्यात आले आहे.

या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा, विशेषतः गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे देवरुख-रत्नागिरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने आणि वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.