जिल्हाधिकारी यांचा निर्णय; रक्षाविषयक अटी व शर्ती मात्र लागू
रत्नागिरी:- आगामी काळातील गणेशोत्सव लक्षात घेवून बुधवार 24 ऑगस्ट पासून चिपळूण ते खेड दरम्यान असलेल्या परशुराम घाटातील सर्व प्रकारची वाहतूक 24 तास सुरु ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतच्या परवानगीचे आदेश दिले आहेत.
डॉ. बी. एन. पाटील जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे परशुराम घाटामध्ये वाहनांची वाहतुक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन त्यांचे निरीक्षणाखाली 24 ऑगस्ट पासून परशुराम घाटातील सर्व प्रकारची वाहतुक 24 तास सुरु ठेवणेस अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
यामध्ये परशुराम घाटात दरड प्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळेत पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी. परशुराम घाटात ठेकेदार कंपनीकडून नियमित पट्रोलिंग ठेवण्यात यावे. तसेच पट्रोलिंग करणाऱ्या वाहनांचा वाहन क्रमांक तसेच पेट्रोलिंग करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक बाबतचा तपशील घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा.
दरडप्रवण क्षेत्रात जेसीबी, क्रेन, पोकलेन अशा अत्यावश्यक सेवा 24 तास उपलब्ध ठेवाव्यात. तसेच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक बाबतचा तपशील घाटात दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा. नेमण्यात येणारे बंदोबस्ताचे पॉईंटवर ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपलब्ध ठेवावेत व त्यांचे संपर्क क्रमांक वाबतचा तपशील घाटातील मेन कंट्रोल रूम सह दर्शनी भागात माहितीसाठी लावण्यात यावा. दरडप्रवण क्षेत्राचे ठिकाणी धोक्याचे फलक लावण्यात यावेत. दरडप्रवण क्षेत्रात मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या फेन्सींग प्रमाणे फेन्सींग करणे आवश्यक आहे. घाटामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संरक्षक भिंती बांधणे आवश्यक आहे. बंदोबस्ताचे ठिकाणी पेंडॉल, पाणी, लाईट, व जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. रेड अलर्ट, अतिवृष्टीचेवेळी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा व वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचा निर्णय संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता यांनी संयुक्तपणे घ्यावा.
हवामानाची स्थिती, पर्जन्यवृष्टीचे प्रमाण, दरड कोसळण्याची शक्यता, वाहतुकीची वर्दळ, त्या-त्या वेळेची स्थानिक वस्तुस्थिती आणि आयएमडी मार्फत अतिवृष्टीचा इशारा असेल त्यावेळी परशुराम घाटामधील 24 तास सुरु असलेली वाहतुक तशीच पुढे सुरु ठेवावी अगर कसे? किंवा ठराविक कालावधीसाठी बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविणे या बाबतचा निर्णय स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी खेड व चिपळूण, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड व चिपळूण आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व रत्नागिरी यांनी संयुक्तपणे घ्यावा व त्याची संयुक्तपणे अंबलबजावणी करावी.
वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड व कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी वाहतुक पोलीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मदतीने करावयाची आहे असेही आदेशात नमूद केले आहे.