Saturday, September 26, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहन खरेदीत मोठी उलाढाल

गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहन खरेदीत मोठी उलाढाल

रत्नागिरी:- गणेशोत्सवाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी १३ ते २१ सप्टेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत ५५७ दुचाकी आणि ८१ चारचाकी वाहनांची खरेदी केली आहे. एकूण ७०१ वाहनांची विक्री झाली असून, या नव्या वाहनांच्या नोंदणीमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे.

कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल झाले होते. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. याच शुभमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी नवीन वाहनांच्या खरेदीला प्राधान्य दिले.

मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वाहनांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. ५५७दुचाकींशिवाय ८१ चारचाकी गाड्या आणि ३७मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय रिक्षा, बस, ट्रॅक्टर, डंपर आणि कॅब आदी वाहनांचाही यात समावेश आहे.

वाहनांची नोंदणी, विविध शुल्क तसेच फॅन्सी नंबरप्लेटची मागणी यांमधून रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसूलात मोठी भर पडली आहे. “गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरीकरांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली असून, आरटीओ कार्यालयास लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे,” अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली.