रत्नागिरी:- कोकण रेल्वे महामंडळाने यावर्षी गणेश भक्तांच्या सेवेसाठी एकूण 376 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातील विविध भागांतील 9.13 लाख प्रवाशांनी या विशेष रेल्वे गाड्यांतून प्रवास केला.यातून कोकण रेल्वे महामंडळाला यावर्षी 43.78 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
गेल्यावर्षी कोकण रेल्वे महामंडळाने 304 गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. त्यावेळी सुमारे 8 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यातून सुमारे 35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळले होते. यावर्षी सुमारे साडेआठ कोटी रुपये उत्पन्नात भर पडलेली आहे. कोकण रेल्वे महामंडळाने 21 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंतच्या काळात 376 गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई, पुणे, कोकणातील रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, गोव्याच्या हद्दीत करमळली, मडगाव, कारवार ते मंगळूरपर्यंतच्या भागांतील गणेश भक्तांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेतलेला आहे.
विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई
कोकण रेल्वे महामंडळाने गणेशोत्सवाच्या काळात सर्व रेल्वेस्थानकांवर तिकीट तपासणीस तैनात केले होते. या काळात रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणार्या 14,654 प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत महामंडळाने प्रवाशांकडून दंडाच्या स्वरूपात 1.02 कोटी रुपये वसूल केले.
विशेष गाड्यांमध्ये वाढ: घाटगे
महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातून गणेशोत्सवासाठी जास्त विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची रेल्वे प्रवाशांकडून मागण्या आल्या. रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आढळून आले होते. त्यामुळे लोकांचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने महामंडळाने यावर्षी गणेशोत्सवानिमित्त 72 जास्त गाड्या सोडल्या होत्या, अशी महिती कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक बबन घाटगे यांनी दिली.