कोरोनाची भीती ओसरली; सलगच्या सुट्ट्या पथ्यावर
रत्नागिरी:- कोरोनाच्या भितीमधून पर्यटक पूर्णतः सावरले आहेत. त्यामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायिकांना डिसेंबर, जानेवारी महिन्याला दिलासा मिळाला. जानेवारीच्या अखेरीस आलेल्या संकष्टी चतुर्थीला गेल्या दहा महिन्यातील उच्चांकी गर्दी गणपतीपुळेत झाली होती. दुपारपर्यंत साडेआठ हजाराहून अधिक भक्तगणांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार जोडून आलेल्या सुट्ट्या पथ्थ्यावर पडल्या आहेत. कोरोनावरील लस दाखल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुपही फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत.
गणपतीपुळे पर्यटन स्थळ अनेकांचे श्रध्दास्थान आहे. गणरायाच्या दर्शनाबरोबरच अथांग किनार्यावर फिरण्याची मौजमजा पर्यटकांना एकाच ठिकाणी घेणे शक्य होते. त्यामुळे दोन दिवसाच्या सुट्टीत पर्यटनासाठी येणार्यांकडून गणपतीपुळेला पसंती दिली जाते. कोरोनामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायाला नोव्हेंबरच्या अखेरीस चालना मिळाली. गेल्या सव्वा दोन महिन्यात दररोज पाच ते सहा हजार पर्यटक सुट्ट्यांचे नियोजन करुन येत होते. ख्रिसमसच्या सुट्टीत पहिले तिन दिवस चांगला प्रतिसाद मिळाला. पून्हा उतरती कळा लागली, पुढे कमी-अधिक प्रमाणात पर्यटकांची रेलचेल सुरु होती; परंतु रविवारी (ता. 31) आलेल्या संकष्टी चतुर्थीला गणरायाला साकडे घालण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत गणपतीपुळे मंदिरात दर्शन साडे आठ हजार पर्यटकांची नोंद झाली. रात्री चंद्रोदयापर्यंत सुमारे पंधरा हजारांवरे पर्यटक नोंदण्यात आले. कोरोना नंतरच्या काळात एवढी गर्दी प्रथमच झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरु झाल्यामुळे हा परिणाम आहे.
शनिवार, रविवारी आलेल्या जोडून सुट्ट्या पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, शेगाव, सिंधुदुर्गसह मुंबई, पुण्यातील सर्वाधिक पर्यटकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केलेली होती. काही बेळगावमधील ग्रुपही फिरण्याच्या निमित्ताने आल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. एसटी, रेल्वेपेक्षाही खासगी वाहनांवर लोकांचा सर्वाधिक भर होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही ठिकठिकाणी होत होती. दर्शनासाठी मंदिर परिसरात येताना मोरया गेटवरील सुरक्षारक्षक मास्क लावण्याचा आग्रह धरत होते. सकाळी 7 वाजता दर्शनाला सुरवात झाली. चंद्रोदय रात्री 9.02 मिनिटांनी आहे. पर्यटकांच्या गर्दीचा फायदा हॉटेल, फेरीवाले, शहाळी विक्रेते, किनार्यावरील जलक्रीडा व्याावसायिक यांच्यासह निवास व्यवस्था करणार्यांना 70 टक्के प्रतिसाद मिळाला.