गणपतीपुळेत समुद्र किनारी फिरण्यास पर्यटकांना मज्जाव 

खवळलेला समुद्र आणि जीवरक्षक नसल्याचे कारण देत अटकाव 

रत्नागिरी:- कोरोनातील निर्बंधात शिथिलता मिळाल्यानंतर सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातून गणतपतीपुळे किनारी आलेल्या पर्यटकांची पूर्णतः निराशा झाली. खवळलेला समुद्र आणि जीवरक्षक नसल्याचे कारण देत स्थानिक पोलिसांनी किनार्‍यावर फिरण्यास पर्यटकांना मज्जाव केला. अनेक पर्यटकांनी दूरुनच लाटांची गाज ऐकत माघारी परतणे पसंत केले.

सलग तीन दिवस सुट्ट्या जोडून आल्या होत्या. शासनाने कोरोनाच्या निर्बंधात 15 ऑगस्टपासून शिथिलता दिल्यामुळे पर्यटकांनी सुट्टीची आनंद लुटण्यासाठी रविवारी (ता. 15) गणपतीपुळे किनार्‍यावर धाव घेतली होती. हजारे पर्यटक दाखल झाले होते. कोरोनामुळे शांत असलेला किनारे पुन्हा गजबजला होता. समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढले. सोमवारीही सुट्टी असल्यामुळे पर्यटकाचा राबता होता. पण स्थानिक पोलिसांनी त्यांना देवस्थानच्या प्रवेशद्वारावरच अडवून ठेवले. जीवरक्षक नसल्याने लोकांच्या सुरक्षिततेसाठी किनार्‍यावर न सोडण्याचा निर्णय झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोना निकषांच्या कार्यवाहीबाबत ग्रामपंचायतीकडून सुचना दिलेल्या नाहीत. पर्यटक येऊन लागल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. पण पोलिसांनी अडकाठी केल्याने त्यांची निराशा झाली. हा प्रश्‍न ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांपर्यंत पोचला. सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, सदस्य संजय माने, शुभांगी ठावरे, सारीका भिडे यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला; मात्र पर्यटकांना किनार्‍यावर सोडण्यास नकार दिला. याबाबत व्यावसायिकांनीही तिव्र नाराजी व्यक्त केली. तोडगा म्हणून गणपतीपुळे देवस्थानच्या सहकार्याने मंदिर परिसरात किनार्‍याजवळ फिरण्यास परवानगी दिली. गणपती मंदिराचे कलश दर्शन आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटा दुरूनच पाहून पर्यटक माघारी गेले. जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत काढलेल्या निर्देशात चौपाट्या, समुद्र किनार्‍यावर फिरण्यास बंदी उठवलेली असतानाच गणपतीपुळे किनार्‍यावर पर्यटकांना अडवण्यात आल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.