रत्नागिरी:– ते पाच-सहा महिन्याचे एक पिल्लू होते. पण ते देवमाशाचे (ब्ल्यू व्हेल) पिल्लू असल्याने तीस फूट लांब आणि सुमारे साडेतीन टन एवढे त्याचे वजन होते. पाच ते सहा महिन्यांचे हे पिल्लू सोमवारी सकाळी गणपतीपुळे किनाऱ्यावर आले. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जिवंत ठेवले. ओहोटीच्यावेळी त्याच्यावर पाणी फवारण्यात आले, आठ तास सलाइन लावण्यात आले आणि ४२ तासांनी ते सुखरूप खोल समुद्रात पोहोचलेही… पण सायंकाळी किनाऱ्यावर ते मृतावस्थेत दिसून आले.
अनेक सरकारी यंत्रणा, अनेक ग्रामस्थ, खासगी कंपन्या, पर्यटक असे शेकडो हात या मोहिमेत निःस्वार्थ भावनेने सहभागी झाले. प्रथम एमटीडीसीचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने त्याला समुद्रात खोलवर नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मासा पुन्हा समुद्रकिनारी लागत होता. ही बातमी पसरताच किनाऱ्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाळूत अडकलेल्या माशाला सोमवारी तीनवेळा समुद्रात ढकलण्यात आले. मात्र, तीनही वेळा तो बाहेर आला.
मंगळवारी पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने तसेच वनविभागाने माशावर वेळीच योग्य उपचार केल्याने तो जगू शकला. रात्री ११:३० वाजता जिंदल कंपनीचे जहाज (टग) व तटरक्षक दलाच्या बोटीने या माशाला खोल समुद्रात व्यवस्थित व सुखरूप सोडण्यात आले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनची चर्चा समाजमाध्यमांवर दिवसभर सुरू होती. मात्र, संध्याकाळी सहाच्या सुमारास वाईट बातमी आली, हा मासा पुन्हा मृतावस्थेत किनाऱ्यावर आला.
वनविभाग, ग्रामपंचायत गणपतीपुळे, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसूल विभाग, एमटीडीसी गणपतीपुळे, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी, वाइल्ड लाइफ पुणे रेस्क्यू टीम तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी बचाव मोहीमेत सहभाग घेतला.