गणेश चतुर्थीच्या दिवशी “वेळ आली होती पण काळ आला नव्हता”!
गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे आज बुधवारी ३१ रोजी गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे- चाकण येथील तरुणाला मरणाच्या दाढेतून बुडताना वाचविण्यात गणपतीपुळे येथील सागर रक्षक दलाचा सदस्य शरद उर्फ शेऱ्या मयेकर,रा.मालगुंड- भंडारवाडा याचे खूप मोठे योगदान ठरले आहे. यावेळी त्याच्या मदतीसाठी गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी अमेय केदार व मिथुन माने व अन्य कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य केले.
गुलशन सुधाकर राठोड (वय 28 मूळ राहणार पानोला, तालुका माहूर, जिल्हा नांदेड) येथील हा तरूण सध्या पुणे चाकण येथे एका कंपनीमध्ये कामाला आहे.यावेळी या वाचविलेल्या तरुणाला पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ नेण्यात आले. पुणे चाकण येथून बेलफी वायरिंग हायर्नेस कंपनीचे एकूण वीस तरुण गणपतीपुळे येथे आज बुधवारी गणपतीपुळे येथे आले होते.मंगळवारी 30 रोजी पुणे चाकण या ठिकाणाहून ते निघाल्यानंतर गणपतीपुळे येथे सकाळी 11 वाजता बुधवारी 31 रोजी पोहोचले.मात्र या सर्व तरुणांना देवदर्शन झाल्यानंतर येथील विलोभनीय असलेल्या समुद्रात आंघोळीचा मोह टाळता आलेला नाही आणि म्हणून सर्वांनी समुद्रात आंघोळ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वजण आंघोळीसाठी समुद्राला उतरले असता त्यातील गुलशन सुधाकर राठोड हा खोल समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी गेला असता बुडू लागला. यावेळी त्याच्या सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला असता, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत असलेला गणपतीपुळे सागररक्षक दलाचा सदस्य शरद अशोक मयेकर (राहणार मालगुंड भंडारवाडा वय 41) याने क्षणाचा ही विलंब न लावता आपल्या ठिकाणी असलेले रिंग बोये घेऊन तात्काळ समुद्रात उडी घेतली आणि खोल समुद्रात बुडणाऱ्या गुलशन राठोडच्या पर्यंत पोहचून त्याला खोल समुद्रात बुडत असताना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळवले. समुद्रातून बाहेर काढल्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय वालिया यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला सुस्थितीत आणले. गणपतीपुळे येथे गणेश चतुर्थी असल्याने बुधवारी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांसह विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. मात्र काही अतिउत्साही पर्यटक व तरुण समुद्रात उतरले होते परंतु बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सागरी जीवरक्षकांना सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायतीचा एकही जीवरक्षक नव्हता. मात्र गणपतीपुळे सागररक्षक दलाचा सदस्य शरद उर्फ शेऱ्या मयेकर हा देवदूतासारखा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे गुलशन राठोड या तरुणाला “वेळ आली होती पण काळ आला नव्हता” या म्हणीप्रमाणे मृत्यूच्या दाढेतून वाचता आले आहे. यावेळी या तरुणाला वाचवणाऱ्या शरद उर्फ शेऱ्या मयेकर याच्या कौतुकास्पद कामगिरीची तात्काळ दखल घेऊन जयगड पोलीस ठाण्याच्यावतीने गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्रामध्ये रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, कॉन्स्टेबल मधुकर सरगर, प्रशांत लोहळकर ,सागर गिरीगोसावी, महिला कॉन्स्टेबल वंदना लाड आदींसह जयगड पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते दरम्यान, बुधवारी गणपतीपुळे येथे ही मोठी घटना घडण्याची चिन्हे असताना बुडणाऱ्या तरूणाला वाचविण्यासाठी तात्काळ रत्नागिरी येथील कोस्टगार्डच्या बोटीला ही पाचारण करण्यात आले होते यावेळी या बोटीने या तरुणाला वाचविण्यासाठी मेहनत घेतली मात्र त्यामध्ये शरद मयेकर यांचा मोलाचा वाटा ठरला . त्यात विशेष म्हणजे शरद मयेकर यांनी सुमारे दीड तास पाण्यामध्ये पाण्यामध्ये आपला धाडसीपणा दाखवत त्या तरुणाला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढत त्या तरुणांसाठी देवदूत ठरल्याचे दाखवून दिले आहे या कामगिरीबद्दल शरद मयेकर याचे रत्नागिरी पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि गणपतीपुळे मालगुंड पोलीस क्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच मालगुंड- गणपतीपुळे परिसरातून त्याचावर विशेष कौतुकाचा वर्षाव होत आहे.









