रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. समुद्रात बुडत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महिला पर्यटकांना येथील स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या जोतिबा डोंगर येथून निशा अजय सांगळे (वय ३०), हर्षदा प्रमोद मिटले (३०), तसेच तनुजा रमेश आभाळे (१७) या तिघीजणी आपल्या कुटुंबासह शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रोजी सकाळी ११ वाजता गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आल्या होत्या.
समुद्रकिनारी आल्यानंतर त्या तिघींनी समुद्रस्नानाचा आनंद घेण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्या अचानक समुद्री लाटांमध्ये अडकल्या आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बाहेर पडणे कठीण झाले. मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला.
त्यांचा आवाज ऐकताच समुद्रकिनारी असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या स्पीड बोटीच्या सहाय्याने तातडीने त्यांच्या दिशेने धाव घेतली. व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी अथक प्रयत्नांनी तिन्ही महिलांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. त्यामुळे तिघींनाही वाचविण्यात वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांना मोलाचे यश मिळाले.
या बचावकार्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे चौकीच्या पोलीस कर्मचार्यांची बहुमोल मदत लाभली. दुर्घटनाग्रस्त तिन्ही महिलांना सुरक्षितरित्या समुद्राच्या पाण्याबाहेर काढल्यानंतर, त्यांना पुढील उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
तेथे त्यांची तपासणी केली असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. वेळेवर धाव घेऊन ही कामगिरी केल्याबद्दल गणपतीपुळे समुद्रकिनार्यावरील वॉटर स्पोर्ट व्यावसायिक, जीवरक्षक आणि पोलिसांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे.