Sunday, September 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला

गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला

गणपतीपुळे:- जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस होत असतानाच ३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून पुन्हा समुद्रकिनारा बंद करण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली होती.

बीच बंद केल्याने अनेक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. यानंतर सर्वांनी एकत्रित येत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यात आली. शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली.

यावेळी गणपतीपुळे येथील ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांकडे समुद्रकिनारा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबतची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली. सध्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीव रक्षक दोन सत्रांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या जोडीला जयगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले होमगार्डही कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. पर्यटकांना समुद्राबाबत योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले.

ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांची बाजू तसेच समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.