रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांची प्रभाग रचना कार्यक्रम सुरु असून सोमवार 21 जुलैपर्यंत नऊ पंचायत समित्यांमध्ये सुमारे 50 हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर लवकरच सुनावणी होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत नव्या गट रचनेनुसार एका गटाची वाढ होणार असून दोन गणांची वाढ होणार आहे. गुहागर तालुक्यामध्ये एक गट व दोन गणांची वाढ होणार आहे. जिल्ह्यात 56 गट आणि जिल्ह्यात 112 गणांची निर्मिती होणार आहे. नवे गट व गण तयार करताना काही गावे अन्य गट व गणांमध्ये गेली आहेत. त्याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे हरकती वाढत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक हरकती या संगमेश्वर तालुक्यामध्ये आहेत. त्या खालोखाल 13 हरकती या राजापूरमध्ये आहेत.
जिल्ह्यात चिपळूण, लांजा व दापोलीमध्ये प्रत्येकी 1, रत्नागिरीत 8, मंडणगडमध्ये पाच हरकती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 50 हरकती पंचायत समित्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. 21 जुलै ही हरकतींची शेवटची तारीख होती. खेड, गुहागरमधून माहिती जिल्हा शाखेकडे पाठवण्यात आली नव्हती. पुढील दोन दिवसात जिल्ह्यात किती हरकती दाखल झाल्या हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर या हरकतींवर सुनावणी होणार आहे. सुनावणी झाल्यानंतर हा अहवाल कोकण आयुक्तांकडे जाणार आहे. त्याठिकाणाहून पुढे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.