खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागा पडून

ॲड. अमेय परूळेकर ; पालिकेकडे ताबाच नसल्याचे उघड

रत्नागिरी:- तब्बल 23 वर्षांपूर्वी मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केलेली जागा पालिकेच्या ताब्यातच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या जागेजवळच एक शाळा असूनही त्या मुलांना या जागेचा उपयोगच झालेला नाही. पालिकेने कित्येक वर्षे त्या आरक्षित जागेकडे पाहिले नसल्याने प्रचंड रान उगवले आहे, अशी धक्कादायक माहिती रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमेय परूळेकर यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत हे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले. ते म्हणाले, शहरांमध्ये आरक्षित केलेल्या भूखंडांची माहिती घेण्यासाठी मी पालिकेकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. यामध्ये आरक्षित जमीन किती गुंठे आहे? या जमिनीचे आरक्षण किती साली झाले? आरक्षण जमिनीचा सर्वे नंबर आणि पत्ता मिळावा, आरक्षण कोणत्या कारणासाठी झाले? ज्या कारणासाठी आरक्षण झालं त्यासाठी सदर भूखंड वापरला गेला का? असल्यास कुठल्या तारखेपासून आरक्षित भूखंडाचा वापर सुरू होऊन वापर बंद पडला होता का? अशी मागणी ऑक्टोबर 2021 ला पालिकेकडे केली होती; मात्र आपण मागवलेली माहिती मोघम स्वरूपाची असून कोणते आरक्षण आहे, त्याची माहिती दिली नाही असे कारण सांगून हा अर्ज निकाली काढण्यात आला होता.
मी पुन्हा 9 डिसेंबर 2021 ला शहरातील शेरेनाका येथील शिवाजी हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मलुष्टे यांच्या घराला लागून असलेल्या जमिनीची माहिती पालिकेकडे मागितली. त्यानंतर माहितीच्या अधिकारात पालिकेने दिलेल्या माहितीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेने दिलेल्या माहितीमध्ये हा भूखंड 19 गुंठे आहे. मलुष्टे यांच्या घराशेजारील ही जागा 27 एप्रिल २००० ला ‘मुलांचे खेळाचे मैदान’ या कारणासाठी आरक्षित करण्यात आला आहे; मात्र ऑक्टोबर 2023 पर्यंत या भूखंडाचा पालिकेने ताबाच घेतलेला नाही. भूखंड आरक्षित होऊन जर तो विनावापर पडून असेल तर त्या जमिनीची साफसफाई होते का? होत असल्यास वर्षातून किती वेळा होते? त्यासाठी वर्षाला किती रक्कम खर्च होते? अशी माहिती मागवली. अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही, असे उत्तर पालिकेने दिले. आरक्षित जमीन नेमकी कसली आहे हे देखील माहिती नसल्याचे सांगण्यात आल्याचे परूळेकर म्हणाले.