रत्नागिरी:- हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुण विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २२ जून रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल प्रमोद पांचाळ (रा. जाकादेवी खालगाव, रत्नागिरी) हे आपली पत्नी प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७) हिला स्कूटरवरून (एम.एच.०८. ए.डब्ल्यु. ०५६६) घेऊन जात होते. हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरून खेडशी नाक्याच्या पुढील सुयोग मँगो दुकानासमोरून जात असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एम.एच.०८. बी.के.४०९९) त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात प्रांजल पांचाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रज्वल पांचाळ हे देखील जखमी झाले आहेत.
या अपघाताप्रकरणी साहील रामदास निवळकर (वय २२, रा. देवरुख) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. डंपर चालक राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी रत्नागिरी, मूळ रा. मध्यप्रदेश) याने आपले वाहन निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवून हा अपघात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस स्थानकात गु.र.नं. १२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.









