Saturday, October 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण

खेडशी येथील २० वर्षीय तरुणाचे अपहरण

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी, एकतानगर येथून २० वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला असून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत आहेत.

साहिल संतोष गुरव (वय २० वर्षे, रा. एकतानगर, महालक्ष्मी मंदिराजवळ, खेडशी, मूळ रा. प्रभानवल्ली-गुरववाडी, ता. लांजा) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल हा दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातून कोणासही काही न सांगता निघून गेला होता. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूचा परिसर, नातेवाईक आणि मित्रांकडे त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

अखेर अज्ञात व्यक्तीने साहिलचे अपहरण करून त्याला पळवून नेल्याची खात्री पटल्याने त्याचे वडील संतोष बाळकृष्ण गुरव (वय ४५, व्यवसाय ड्रायव्हिंग) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाचा ठावठिकाणा लावण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत आहे.