खेड उधळे येथे क्वालीस अपघातात 1 ठार; 3 गंभीर जखमी

खेड:- चालकाला झोप अनावर झाल्याने क्वालीस कारवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर कारमधील अन्य तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील उधळे गावानजीक घडला. जखमी प्रवाशांना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार क्वालीस कार ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कार महामार्गावरील कशेडी घाट उतरुन उधळे गावानजीक आली असता झोप अनावर झालेल्या चालकाचा करवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील ती कार रस्त्यावरील मोरीवरून खाली कोसळली.

या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी समेळ सुर्वे हे तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान खेड पोलीस देखील घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त प्रवाशांना बाहेर काढून तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसात खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.