रत्नागिरी:- रत्नागिरी शहराची हवा प्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चोविस तासांच्या मानांकनाच्या मर्यादेत आहे. कोविडमधील टाळेबंदीमुळे वाहनांची कमी प्रमाणातील वर्दळ आणि त्याद्वारे वातावरणात होणारे प्रदूषण घटकांचे उत्सर्जन, जून व जुलै महिन्यातील पर्जन्यवृष्टीमुळे शहराची हवा प्रदूषण पातळी मानांकनाच्या मर्यादेत आहे. शहरातील वातावरण निरोगी आहे, असा निष्कर्ष मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांतर्गत सुरु असलेल्या अभ्यासातून काढण्यात आला.
मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनुदानातून रत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाचे कामकाज सुरु झाले आहे. मुंबई विद्यापिठांतर्गत येणार्या रत्नागिरीतील स्व. डॉ. धनंजय कीर उपकेंद्रात सुरु आहे. या प्रकल्पाचा औपचारीक उद्घाटनप्रसंगी प्रकल्पप्रमुख डॉ. पांडुरंग पाटील यांनी रत्नागिरी शहराच्या हवा प्रदूषण प्रकल्पाबद्दल व हवा प्रदूषणाच्या सद्यः स्थितीबद्दल माहिती दिली. शहरातील हवा प्रदूषण मापनासाठी रत्नागिरी उपपरिसराची कार्यालयीन इमारत (टेरेस) आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारतीचा समावेश आहे. या प्रकल्पाद्वारे शहरातील एसओ 2, एनओ 2 व पीएम 10, पीएम 2.5 (धूलिकण) या हवा प्रदूषण घटकांचे मोजमाप केले जाते.गेल्या पाच महिन्यांच्या नोंदीमध्ये रत्नागिरी शहर प्रदुषणमुक्त असल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या मानांकनानुसार सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांचे प्रमाण कमी आले. सीओटू आणि एनओटू चे प्रमाण 80 मायक्रोग्रॅम परमीटर क्युबच्या दरम्यान असणे आवश्यक असते. रत्नागिरीतील नोंदी मानांकनाच्या खाली आहेत. पीएम 10 (धुलीकण) चे मानांकन 100 मायक्रोग्रॅम पर मीटर क्युब आणि पीएम 2.5 चे मानांकन 60 मायक्रोगॅम पर मीटर क्युब अपेक्षित आहे. पीएम 2.5 धुलीकण हे श्वसन नलीकेमधून फुफ्फुसात प्रवेश केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरु शकतात. रत्नागिरी शहरातील दोन ठिकाणी घेतलेल्या नोंदी या प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहेत. मार्च 2023 ला याचा अहवाल राज्य शासनाच्या प्रदुषण मंडळाकडे सादर केला जाईल. यामध्ये वैज्ञानिक सहाय्यक अजय गौड, क्षेत्र सहाय्यक सुशांत कुंभार आणि कैलास जाधव हे साह्य करत आहेत.
उद्घाटन सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित नुकताच झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड आणि उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.









