आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
राजापूर:- तालुक्यातील खरवते कोष्टीवाडी येथील ८१ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रेवती नारायण निमणकर (वय ८१, रा. खरवते कोष्टीवाडी, ता. राजापूर) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे.
फिर्यादी भास्कर परशुराम गुरसाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रेवती निमणकर या त्यांची चुलत मावशी असून त्या वयोवृद्ध झाल्याने सतत आजारी असायच्या. सततच्या आजारपणाला त्या कंटाळलेल्या होत्या. १२ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास त्या झोपलेल्या खोलीत दिसून आल्या नाहीत.
कुटुंबीयांनी व परिसरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला असता, रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील वसंत गोविंद सवादे यांच्या मालकीच्या विहिरीत त्या उपड्या स्थितीत पाण्यावर तरंगताना आढळल्या. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना तात्काळ विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दुपारी ०२:५१ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









