क्रीडा संकुलासाठी 13 कोटीचा नवा प्रस्ताव

ना.उदय सामंत ; सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, मल्टिपर्पज हॉल, सुट

रत्नागिरी:-अनेक दिवसांपासून रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला चालना मिळणार आहे. त्यासाठी 13 कोटी 77 लाखाचा जादा खर्चाचा प्रस्ताव आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे. या प्रस्तावामध्ये सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल ग्राउंड, मल्टिपर्पज हॉल, बॅडमिंटन कोर्ट, व्हियापी आणि साधे सुट असणार आहे. खेळाडुंना दर्जेदार सुविधा मिळाव्या, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे,  अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.

दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड व संबंधित अधिकारी उपस्थित होते. उदय सामत क्रीडा मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलासह जिल्ह्यात मोठे जिल्हा क्रीडा संकुल मंजूर करून आणले होते. एमआयडीसीत त्याचे काम सुरू झाले. सुमारे 8 कोटी रुपये त्यावर खर्च झाले आहे. त्यामध्ये संरक्षक भिंत आणि कार्यालयाचेच काम झाले आहे. निधी नसल्याने हे काम काही वर्षे रखडले होते. त्या अनुषंगाने उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन आज बैठक घेतली. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. ते म्हणाले, मी क्रीडा मंत्री असताना जिल्हा क्रीडा संकुल मंजूर केले होते. त्यावर आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. निधी नसल्याने त्याचा जादा खर्चाचा 13 कोटी 77 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल ग्राऊंड, मल्टीपर्पज हॉल, दोन बॅडमिंटन कोर्ट, 5 व्हीआयपी सुट, 10 साधे सुट, कंपाऊड, गेट आदीचा समावेश आहे.प्रस्ताव सोमवारपर्यंत शासनाकडे येणार आहे. येत्या आठवडा भरात तो प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळून चांगले खेळाडु निर्माण व्हावे, या उद्देशाने या प्रकल्पाला चालना दिली जात आहे.