रत्नागिरी:- आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या डोसचे 1 लाख 52 हजार 529 इतक्या लसीकरणाची कार्यवाही पूर्णत्वास गेल्याचे जिल्हा आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. त्यात पहिला डोस 1 लाख 27 हजार 462 तर दुसरा डोस 25 हजार 67 जणांनी घेतला आहे. जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे 3 हजार 330 डोस शासनाकडून उपलब्ध झाले आहेत.
आतापर्यंत 112 केंद्र लसीकरणासाठी निश्चित केली आहेत. त्यातील 70 टक्के केंद्रावर रविवार 25 एप्रिलपर्यंत लसीकरण थांबवण्यात आले होते. लस उपलब्ध असलेल्या 35 केंद्रांवर मोहीम सुरु ठेवण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्याला 1 लाख 47 हजार डोस प्राप्त झाले होते. त्यातील 1 लाख 34 हजार डोसचे वितरण झाले आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे काही केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. अपुऱ्या लस पुरवठ्याची माहिती प्रशासनाकडून वरिष्ठांकडे गेली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी पुन्हा 10 हजार कोविशिल्डचे डोस जिह्याला प्राप्त झाले होते. सोमवारी सकाळी जवळच्या केंद्रांवर त्याचे वितरण करुन लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. त्यातील काही लससाठा शिल्लक राहिला. मात्र अपुरा लससाठा उपलब्ध पाहता जिल्हा आरोग्य विभागाला मंगळवारी पुन्हा कोव्हक्सीनचे 3 हजार 330 डोस शासनाकडून उपलब्ध झाले आहेत.
आज बुधवारपासून जिल्ह्यातील सर्व केंद्रात पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे. जिल्ह्याला आतापर्यंत सुमारे 147080 एवढा लस साठा राज्यस्तरावरुन प्राप्त झाला आहे. राज्यस्तरावर कोविड लससाठा उपलब्ध होताच जिह्यासाठी लस पुरवण्याचे तत्काळ नियोजन केले जात आहे. शासनाकडून पुरेशी लस मिळत नसल्याने जिह्यातील लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे. जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरणासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून लस घेण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.









