रत्नागिरी:- सत्ताधार्यांना कोविडमध्ये भ्रष्टाचार करण्याचेे कुरणच मिळालं आहे. भावनिक वातावरण निर्माण करून लोकं आत मतं देणार नाहीत, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी भूमिकाच आता कोकणी माणसानं घेतली आहे, असे सांगून कोकण विकासात मुस्लिम समाजाचा मोठा हात असल्याचे प्रतिपादन राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. ते रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला आ. प्रसाद लाड, माजी आ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आादी उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर यांनी कोविडच्या नावाखाली शासनाने आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका केली.
यावेेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार कमी पडलं आहे. तिसरी लाट येणार असं सांगितलं जातंय, तिसर्या लाटेच्या प्रतिक्षेत रहावं लागतंय, हे मोठं दुर्दैव असल्याचं ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीवर निशाणा सााधताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री केवळ भावनिक वातावरण निर्माण करतायत. इतर राज्यं स्थिर झाली आहेत. आम्ही मात्र लाटेची प्रतिक्षा करतोय. राज्य सरकार कोरोनाचा बागूलबुवा करीत असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली.
कोविड हे भ्रष्टाचाराचं कुरण ठरलं आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे. कोविड सेंटर उभारण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार आहे. आज ना उद्या हे सारं बाहेर येईल, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.
ना. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने कोकणचा विकास निश्चित होईल, अशी ग्वाही देत ते पुढे म्हणाले की, ज्या योजना १ कोटीपासून २०० कोटीपर्यंत आहेत त्या सर्व योजना कोकणात राबवल्या जातील. उद्योग व्यवसायाला गती देण्याचा प्रयत्न यातून होणार असून कोकणच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
ना. नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणात लघू, मध्यम, सूक्ष्म प्रकल्प येतील. त्याचा पाठपुरावा केला जाईल. तसेच हे प्रकल्प होत असताना विरोधक सोबत आल्यास त्यांना बरोबर घेऊन हे प्रकल्प पुर्णत्त्वास नेऊ असे ते यावेळी म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यात अंत्योदय प्रतिष्ठान तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. निरंजन डावखरे, आ. भाई गिरकर, आ. रमेश पाटील यांच्या निधीतून ही कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाल्याचे दरेकर यांनी सांगितले.