कोरोना काळात शाळांमधील पटसंख्येत मोठी घट 

1 हजार 385 शाळा विसपेक्षा कमी पटाच्या 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या हा चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात 1 हजार 385 शाळा वीसपेक्षा कमी पटाच्या आहेत. नोकरीसह पाल्यांच्या शिक्षणासाठी गावातून शहरांकडे येणार्‍यांचा कल वाढू लागला असून शहराजवळील गावातील प्राथमिक शाळांचा पट कमी होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थी संख्या नेमकी का घटते हा अभ्यासाचा विषय बनू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अडीच हजार शाळा आहेत. मागील दोन वर्षात वीस पटांच्या शाळांची संख्या तेरोशे ते चौदाशेच्या दरम्यान राहील्या आहेत. जिल्ह्यात चार नगरपालिका आणि पाच नगरपंचायती आहेत. कोकणवासीयांचे नाते मुंबईशी जुळलेले असल्याने अनेक तरुणांचा कल नोकरीसाठी तिकडेच कल आहे. अनेक तरुण शिक्षण घेऊन दुर्गम गावातून शहराकडे येऊ लागले आहे. दळणवळणांची साधने वाढल्याने पालकांचा पाल्याच्या शिक्षणाकडील कल खासगी व इंग्रजी शाळांकडे वाढला आहे. तसेच पहिली ते चौथीपर्यंत पूर्वप्राथमिक, पाचवी ते सातवी प्राथमिक व आठवी ते दहावी माध्यमिक शाळा असते. अनेक पालक पहिलीपासून मुलांना एकाच शाळेत ठेवण्यासाठी धडपडतात. अशावेळी ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना ठेवण्यास नापसंती दर्शविली जाते. तसेच इंग्रजी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी खासगी शाळांनी सेमी इंग्लिश सुरू केले; मात्र याचाच वापर काही मोजक्याच जिल्हा परिषद शाळांमधून सुरु आहे; मात्र दुर्गम भागातील शाळांतील मुले अन्यत्र कुठेच जात नाहीत.

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांतील शाळांचा पट स्थिर आहे. कुटूंबनियोजन हा पटसंख्या कमी राहण्याचे एक कारण मानला जात आहे. पुर्वी दुर्गम आणि विरळ लोकवस्ती असलेल्या भागातही शासनाने मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरु केल्या. त्यामुळे एका बाजूला असलेल्या डोंगराळ भागातील शाळांचा पट कमी दिसत आहे. त्याचबरोबर कोकणातील लोक मुंबईला स्थलांतरीत होत असल्याने पटसंख्येवर परिणाम होत आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सेमीइंग्रजी, शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल, आधुनिक साधनांचा वापर करुन शिक्षण पध्दती यासह विविध स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.