कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रत्नागिरीत सापडले दोन रुग्ण ?

नमुने तपासणीसाठी पुण्याला

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे हे रुग्ण असल्याचा आरोग्य यंत्रणेला संशय आहे. दोन रुग्णांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहे. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले असून, नेमका कोणता व्हेरिएंट आहे, हे अहवाल आल्यानंतर समजणार आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. राज्यातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र, आता नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केले होत्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी खबरदारीसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. आरोग्य विभाग सतर्क असताना रत्नागिरी तालुक्यात हे दोन बाधित सापडले आहेत. यामध्ये तोणदे आणि कसोप येथील बाधितांचा समावेश आहे. या दोघांना घशाची खवखव, खोकला आणि श्वसनाचा त्रास सुरू होता. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.