कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी तालुका ठरतोय ‘हॉटस्पॉट’ 

रत्नागिरी:-दुसर्‍या लाटेमध्ये रत्नागिरी तालुका कोरोना रुग्णांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. एप्रिल महिन्यात पावणेतीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून सध्या 1 हजार 365 जणं उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सर्वाधित 167 मृतांची नोंद याच ठिकाणी झाली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य ठिकाणी असून परजिल्ह्यातील सर्वाधिक संपर्क याच ठिकाणी होत आहे. औद्योगिक वसाहतींमध्येही मोठमोठे प्रक्रिया उद्योग, विजनिर्मिती प्रकल्प यांचा राबता आहे. मार्च महिन्यात शिमगोत्सवासह विवाहसोहळे, सार्वजनिक उत्सव यामध्ये मोठ्याप्रमाणात लोकांचा एकमेकांशी संपर्क झाला. मुंबईकरांचाही संपर्क वाढल्याने रुग्णांच्या संख्येत अधिक भर पडली. रत्नागिरी तालुक्यात आतापर्यंत एकुण रुग्णांची नोंद 6 हजार 048 इतकी आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पन्नास ते सत्तर पर्यंत रुग्ण सापडण्याचे प्रमाण होते; मात्र त्यात दुसर्‍या आठवड्यापासून वाढ होण्यास सुरवात झाली. महिन्यात सोळा दिवसात दररोज शंभरपेक्षा अधिक नोंद झाली होती. एका दिवशी तर अडीचशे रुग्ण सापडले. कारखाने असलेल्या भागात रुग्णांची संख्या अधिक होती. मधल्या कालावधीत वाडीच्या वाडी बाधित आहे. वेळेत उपचार न झाल्यामुळे रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढला.
दाखल होणार्‍या रुग्णांना उपचारासाठी पाच कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात अतिदक्षता बेडस्ची सुविधा आहे. ज्यांना कमी लक्षणे किंवा लक्षणे नाहीत अशांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पावणेचार हजार लोक उपचाराखाली आहेत. त्यातील सुमारे 1365 जणं एकट्या रत्नागिरी तालुक्यातील आहेत. या आकडेवारीतूनच तालुक्यातील कोरोनाचे चित्र स्पष्ट होते.