रत्नागिरी:- गेल्या काळी वर्षानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीला कोकणातील निसर्ग सौदर्यासोबतच येथील ऐतिहासिक ठेव्याची भुरळ पडली आहे. अमृता राव निर्मित व सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेल्या नव्या ’श्यामची आई’ चित्रपटाचे चित्रिकरण पावसजवळील मावळंगे गावात सुरु झाले आहे. यामध्ये पन्नासहून अधिक स्थानिक कलाकार पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत.
सोमवारी (ता. 4) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. ’शाळा’, ’फुंतरू’, ’आजोबा’, ’केसरा’ असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारे तरुण दिग्दर्शक सुजय डहाके एका नव्या आव्हानासह रसिकांच्या भेटीला आले आहेत. अमृता अरूण राव यांची निर्मिती असलेला ’श्यामची आई’ हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच, साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसफष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या 150 व्या जयंतीचं आहे. याच पुण्यपर्वाचं औचित्य साधत हा महत्त्वाकांक्षी चित्रटाचे चित्रिकरण रत्नागिरी तालुक्यातील मावळंगेत सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटाची बरीच वैशिष्ट्यं असतील. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हा चित्रपट ब्लक अँड व्हाईट मध्ये असेल. या चित्रपटात बिरटिश राजवटीतील 1912 ते 1947 पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी 150 जणांच्या ताफा गावात दाखल झाला आहे. सुमारे 78 कलाकार या चित्रपटात दिसणार असून त्यातील 50 कलाकार रत्नागिरी, चिपळूण, राजापूरमधील आहेत. याबाबत सुजय डहाके म्हणाले, ’श्यामची आई’ कांदबरी वाचताना त्यावर आधारी चित्रपट काढण्याची इच्छा झाली. 1953 मध्ये पहिला चित्रपट आला होता. मात्र त्यात बदल करुन शाळेतील, तरुण आणि प्रौढत्त्वातील सानेगुरुजी अशा तिन टप्प्यातील त्यांचा प्रवास साकारण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. त्यामुळे जुन्या चित्रपटापेक्षा हा निश्चितच वेगहा आहे. त्यांच्यावेळची स्थिती साकारण्यासाठी आवश्यक वातावरण मावळंगेत मिळाले. नेनेंचा वाडाही जुनाट आहे. हे स्थळ लोकांना भुरळ घालेल.