कोविड रुग्णालयातील घटना; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
रत्नागिरी:- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मात्र यानंतर मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात घुसून हंगामा केला. सर्व नियम पायदळी तुडवत नातेवाईकांनी परस्पर मृतदेह राजीवडा येथे नेऊन अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीत काळजी घेणे अत्यावश्यक असताना मृताच्या नातेवाईकांनी स्वतःसह इतरांच्या आरोग्याची सुरक्षा अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याने यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला. राजिवडा येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा कोविड रुग्णालयात उपाचर सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कोरोना बाधित मृतदेह पुर्णतः गुंडाळुन सर्व खबरदारी घेऊन सिव्हिल किंवा पालिकेचे कर्मचारी त्यावर अंत्यसंस्कार करतात, असा नियम आहे. मात्र रुग्णालयात आल्यानंतर बाधिताचा मृत्यूच होतो, असा गैरसमज करून संतापलेल्या सुमारे 35 ते 40 जणांचा जमाव रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शिरला. रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी, डॉक्टर आदींना न जुमानता संतप्त जमाव पुढे आला. त्यांनी कोणतीही खबरदारी न घेता तो मृतदेह उचलून नेऊन त्याच्यावर राजिवड्यात अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.