कोरोना चाचणीला विरोध करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल 

रत्नागिरी:- ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामस्तरावर कडक धोरण अवलंबले आहे. गावागावात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांशी संवाद साधून त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. भविष्यात चाचणीला विरोध दर्शविणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचीही तयार केली आहे.

राज्यात अनलॉकच्या पध्दती जाहीर झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा 4 थ्या टप्प्यात असून पॉझिव्हिटी रेट 14.12 टक्के आहे. तो कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. चाचण्या वाढल्या की बाधितांची संख्या वाढेल आणि तातडीने उपचार करणे शक्य होईल. जिल्ह्यात बरेचसे लोक लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष करतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होतो. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन चाचणी करुन घेणे गरजेचे आहे. कोणत्याही गावात किंवा शहरात कोरोनाचे लक्षण असलेले लोक चाचणीसाठी तयार होत नसतील किंवा विरोध करत असतील तर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांचे पथक विरोध करण्या-यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुयोग्य व अधिक सक्षमतेने करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांमुळे अधिक फैलाव होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. बाधितांना कोणत्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात विलगीकीकरण कक्ष उभारलेले आहेत. यामध्ये 60 वर्षपेक्षा जास्त वय असणा-या जेष्ठ लोकांना संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य केले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा योग्य सोयी असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आणि लहान मुले असणारे पालक यासारख्यांना जिल्हाधिकार्‍यांच्य निर्देशनुसार 5 निकषात बसणा-या लोकांना शिक्के करुन गृहविलगीकरणात ठेवले जाते. त्यामुळे निश्चितच फलाव रोखण्यास मदत होईल.

प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले आहे. यामध्ये ग्रामसेवकांची भूमिक महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत स्तरावर 5 पथके काम करणार आहेत. जिल्हयात कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु आहे. विनाकारण फिरणारे किंवा मास्क न वापरणारे यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जात आहे. मोकाटपणे फिरणा-यांची कोरोना चाचणीही केली जाते. यामुळे काही दिवसात होईल असा विश्‍वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून काढलेल्या पत्रकाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केला.