कोमसापने कोकणातील साहित्याची परंपरा कायम ठेवली: मधु मंगेश कर्णिक

रत्नागिरी:- कोकण प्रदेश वैविध्यतेने नटला आहे. या प्रदेशातील प्रत्येक ठिकाणच्या रुढी परंपरा या वेगवेगळ्या आहेत. वैविध्यतेने नटलेल्या या कोकणाला अखंडीत एकत्र ठेवण्याचे काम साहित्याच्या माध्यमातून होत आहे. याच हेतूने स्थापनेपासूनच मागील तीस वर्षे कोकण मराठी साहित्य परिषदेने कोकणात साहित्य रुजवले आणि वाढवले. कोमसापने कोकणातील साहित्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक अध्यक्ष तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, विश्वस्त मंडळ अध्यक्ष रमेश कीर, कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर, गजानन पाटील आदी उपस्थित होते. कोमसापची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी नमिता कीर यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी प्रा. प्रदीप ढवळ, कार्यवाह प्रा.माधव अंकलगे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, डॉ. शशांक पाटील, सुधीर सेठ, मोहन भोईर, प्रवीण दवणे, लता गुठे, प्रशांत डिंगणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोमसापच्या इतिहासात प्रथमच नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आली आहे. या मंडळात ना. उदय सामंत, आ. संजय केळकर, ज्योती ठाकरे, शोभा सावंत, प्रा. अशोक ठाकूर, उषा परब यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितले की, कोकणातील विविध प्रातांत वेगवेगळ्या रुढी, परंपरा, चालीरिती आहेत. कोकण प्रदेश एक असला तरी डहाणूची संस्कृती वेगळी आणि सावंतवाडीची संस्कृती वेगळी आहे. मात्र, केवळ साहित्याच्या माध्यमातूनच कोकणात एकात्मता टिकून आहे. साहित्याचा प्रवाह गतीमान करणे या हेतूने कोमसापची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. संस्था नियमात चालावी यासाठी नियामक मंडळाचीही स्थापना करण्यात आली आहे.

डॉ. मुणगेकर म्हणाले की, साहित्यामुळेच मी घडलो आहे. कोमसापची व्याप्ती वाढत आहे. आर्थिक पसारा सांभाळण्यासाठीच नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोमसापचे महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन हे उपक्रम फार चांगले आहेत.

नूतन अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, कोरोना काळातही कोमसापचे कार्य थांबलेले नाही. ऑनलाईन व्याख्याने, कविता संमेलन, लेखन संदर्भात कार्यशाळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोमसापचे चार हजार सदस्य असून, सदस्य संख्या वाढवण्यासाठी मोहीम राबवण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.