रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर, मजगांव रोड येथून मंगळवार ०३ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला आहे. घरात कोणालाही काहीही न सांगता तो कपड्यांची बॅग आणि मोबाईल घेऊन निघून गेल्याने त्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा १७ वर्षीय मुलगा अमानत अली मजीद हाज हा ३ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून कपड्यांची बॅग आणि मोबाईल घेऊन बाहेर पडला. घरात कोणालाही काहीही माहिती न देता तो निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.
अल्पवयीन मुलगा घरी परत न आल्याने त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय त्याच्या आईने व्यक्त केला आहे. या संदर्भात, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस बेपत्ता मुलाचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.