रत्नागिरी:- वाशी, अहमदाबादसह महत्त्वाच्या बाजारपेठांमधील दरानूसार रत्नागिरीतील केंद्रांवर स्थानिक बागायतदारांकडून हापूस खरेदी करण्याबाबत इनोटेरा कंपनी आणि स्थानिक बागायतदारांशी सकारात्मक चर्चा झाली. जागेवर खरेदी आणि रोखीतील व्यावहार या बोलीवर आंबा देण्यास स्थानिक बागायतदारांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या 10 मार्चपासून रत्नागिरीत इनोटेरा कंपनीची आंबा खरेदी सुरु होणार आहे.
रविवारी (ता. 27) झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध देशांमधील निर्यातीबरोबरच हापूसची चव देशाच्या कानाकोपर्यात पोचवण्यासाठी इनोटेरा कंपनीकडून यंदाच्या हंगामात पावले उचलण्यात आली आहे. स्थानिक बागायतदारांबरोबर गेले काही दिवस सकारात्मक चर्चा झाली होती. रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये इनोटेराचे प्रतिनिधी दिपक बन्सल यांच्यासह बागायतदारांबरोबर चर्चा झाली. यावेळी तुकाराम घवाळी, राजेंद्र कदम, राजू पावसकर यांच्यासह अनेक बागायतदार उपस्थित होते. कोकणातील शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करावी आणि त्याद्वारे इनोटेराला आवश्यक आंबा विक्री करावा अशी सुचना करण्यात आली होती; मात्र हंगामाच्या तोंडावर तांत्रिकदृष्ट्या संस्था स्थापन करणे शक्य नाही. त्यामुळे हंगामाच्या आरंभी कंपनीच्या केंद्रांवर बागायतदारांकडून थेट आंबा खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये 150 ग्रमपासून 325 ग्रम वजनापर्यंतचा आंबा ग्रेडेशननुसार खरेदी केला जाईल. डझनच दर ठरवताना मुंबईतील वाशी किंवा अन्य बाजारपेठेतील चालू दरानुसार खरेदी करण्यास कंपनीकडून तयारी दर्शविण्यात आल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले. आंबा खरेदीसाठी रत्नागिरी तालुक्यात तीन तर अन्य ठिकाणी सहा केंद्र सुरु केली जाणार आहे. ही खरेदी 10 मार्चपासून केली जाणार असून दराबाबत एक दिवस आधी सुचना देण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले आहे. जास्त माल असेल तर तो संबंधित शेतकर्याच्या बागेमध्ये जाऊन आणण्याची तयारीही यावेळी दर्शवली आहे; मात्र कमी पेट्या असल्या तर बागायतदाराला केंद्रापर्यंत तो आणून द्यावा लागणार आहे. याप्रसंगी बागायतदारांनी आंबा देण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच दर्जाप्रमाणे दर ठरवा आणि जागेवर पैसे द्या अशी सुचना केली आहे. त्यानुसार कंपनी विचार करुन निर्णय घेणार आहे.
याप्रसंगी बागायतदार राजेंद्र कदम यांनी डागी आंब्याच्या खरेदीविषयी विचारले असता कंपनीकडून किलोने डागी आंबा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.