रत्नागिरी:- अतितापमान, सतत पाऊस अन् त्यामुळे वाढणारी आर्द्रता यामुळे कोकण, मुंबई, ठाणे, केरळ व तामिळनाडू भागाला ’वेदर डिस्कम्फर्ट’ चा इशारा हवामान विभागाकडून दिला आहे.
मागील काही दिवस उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे काम नसेल तर शक्यतो बाहेर पडू नका, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दीड महिन्यापासून राज्यातील बहुतांश भागात अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता याला वेदर डिस्कम्फर्ट असे वैज्ञानिक नाव हवामान तज्ज्ञांनी दिले आहे. त्याची प्रचिती रत्नागिरीतही जाणवत आहे. शनिवारी (ता. 22) पहाटेच्या सुमारास थंड वातावरण होते. त्यानंतर दिवसा उन्हाची तिव्रता जाणवत होती. येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. कोकणाबरोबरच मुंबई, ठाणे जिल्ह्यातही वातावरणातील विचित्र परिस्थिती राहणार आहे. तेथे जास्त आर्द्रता आहे. या वातावरणामुळे उष्माघाताचा जास्त धोका असल्यामुळे भरपूर पाणी प्या, ताक, घरातील सरबत घ्या, असा सल्ला हवामान विभागाने यंदा प्रथमच दिला आहे.