कोकण मार्गावर दोन दिवाळी स्पेशल

रत्नागिरी:- दीपावली सुट्टी हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी दोन दिवाळी स्पेशल जाहीर केल्या. मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशलसह चिपळूण- पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलचा समावेश आहे. साप्ताहिक स्पेशलचे आरक्षण १ ऑक्टोबरपासून खुले होणार आहे.

०१००४/०१००३ क्रमांकाची मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक दिवाळी स्पेशल ५, १२, १९ ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी धावणार आहे. मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ६,१३,२० ऑ क्टोबर रोजी दर सोमवारी धावेल. एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या स्पेशलला २० एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबेल देण्यात आले आहेत.

दीपावली सुट्टीसाठी ०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण- पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलही चालवण्यात येणार आहे. ३ ते २६ ऑक्टोबरपर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चालवण्यात येणार आहे. चिपळूण येथून ११ वाजून ५ मिनिटांनी सुदून त्या दिवशी सायंकाळी ४.१० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ४.४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल. आठ डब्यांच्या मेमू स्पेशलला आंजणी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासु पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.