किनारपट्टीवरील कासवाचे आता थेट उपग्रहाशी कनेक्शन; आंजर्ले येथून टॅग लावलेले कासव समुद्रात

रत्नागिरी:-  कोकण किनारपट्टीवर येणार्‍या ऑलिव्ह रिडले कासवांचे मार्गनिरीक्षण करण्यासाठी उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅगिंगचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वेळास आणि आंजर्ले येथून टॅग लावलेले कासव मंगळवारी (ता. 25) समुद्रात सोडण्यात आले. वेळास येथून सोडण्यात आलेल्या कासवाला प्रथम असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानतर्फे डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानच्या माध्यमातून राबवलेला भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील पहिला प्रकल्प आहे.

सागरी कासवांच्या सात प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले’ ही प्रजाती कोकण किनारी आढळते. या प्रजातीतील कासवे दुर्मिळ होऊ लागल्यामुळे तिच्या बचावासाठी पुढाकार घेतला जात आहे. कोकणातील समुद्राच्या वाळूचे विशिष्ट तपमान या कासवांची अंडी उबविण्यासाठी मानवते. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून ती किनार्‍यालगत प्रजननासाठी येतात. त्यांचा सविस्त अभ्यास आजतागायत ऑलिव्ह रिडले कासवाचे टॅगिंगद्वारे फक्त भारताच्या पूर्वी किनार्‍यावरच झाला. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर प्रथमच वेळास येथे ऑलिव्ह रिडले कासवाला उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅगिंग करण्याचा निर्णय महाराष्ट्र वन विभागाचे कांदळवन प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या सागरी स्थलांतरण मार्गाचे उपग्रहीय निरीक्षण या वैज्ञानिक प्रकल्पाकरीता डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेण्यात आली आहे. कांदळवन प्रतिष्ठानने यासाठी सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किनार्‍याजवळील सागरातील भ्रमणाबाबत माहिती मिळण्यास मदत होईल.

या प्रकल्पांतर्गत एकूण 5 ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅग लावले जाणार आहेत. त्यातील पहिले कासव वेळास येशे टॅग करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आणि भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील हे टॅग केलेले पहिले कासव असल्याने त्याला ‘प्रथम’ असे नाव देण्यात आले. त्याचबरोबर आंजर्ले येथेही एका कासवाला टॅग करण्यात आला आहे. दोन्ही कासवं समुद्रात सोडण्यात आली असून या निमित्ताने कासव संवर्धनातील एका नवीन पर्वाला सुरवात झाली आहे. कांदळवन प्रतिष्ठान आणि भारतीय वन्यजीव संस्थानतर्फे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पाच ठिकाणांवरील विविध रिडले कासवांना टॅग लावले जाणार आहे. दरम्यान, लांबलेल्या पावसामुळे कासवांच्या विणीचा हंगाम पुढे गेला होता. तसेच दरवर्षी येणारी कासवं तिच आहेत की वेगवेगळी आहेत याचा अभ्यास टॅगिंगच्या निमित्ताने होणार आहे.