कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याने पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

रत्नागिरी:- कृषी सेवा केंद्रांनी कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणार्‍या पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके यांचे जिल्ह्यातून विविध विक्री केंद्रामधून घेतलेल्या नमुन्यांपैकी अप्रमाणित नमुने असलेल्या विक्री व उत्पादन करणार्‍या कंपन्याविरुद्ध तीन कोर्ट केसेसही दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे यांनी दिली.

जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते तसेच उत्पादक कंपनी यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी सुनंदा कुर्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुर्वनियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या सभेमध्ये खरीप हंगामासाठी लागणारे भात व नाचणी बियाणे पुरवठाबाबत चर्चा झाली. तसेच भात पिकासाठी लागणार्या खतांमध्ये महत्त्वाचे असणारे युरिया खताच्या पुरवठ्याबाबत आरसीएफ कंपनीच्या प्रतिनिधी समवेत नियोजन करण्यात आहे. में महिन्याअखेर सर्व खताचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या सभेसाठी कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, भात संशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी, कृषी अधिकारी पोकळे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सागर साळुंखे, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक, खत उत्पादक कंपनी आरसीएफ, इफको व एमएआयडीसी यांचे प्रतिनिधी व खते, बियाणे विक्रेते उपस्थित होते.

ज्या ठिकाणी खते व बियाणे यांची विनापरवाना विक्री केली जाते, अशा ठिकाणी तात्काळ संबंधित तालुक्याच्या तक्रार निवारण समिती किंवा भरारी पथकाला माहिती देण्याबाबत आवाहन केले आहे. शेतकर्‍यांना पुरवठा करण्यात येणार्‍या निविष्ठांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी जिल्ह्यातील निरीक्षकांना सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणे तसेच आलेल्या निविष्ठांचे नमुने घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.