चिपळूण:- चिपळूण तालुक्यात कामथे घाटात केमिकलच्या टँकरला भीषण आग लागली आहे. आज दुपारी कामथे धरण परिसरात ही आग लागली असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सध्या लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यात वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या जागीच थांबल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जात असलेल्या केमिकल टँकरने पेट घेतला. कामथे धरण परिसरात मुंबई गोवा महामार्गावर ही घटना घडली. अचानक भर रस्त्यातच टँकरने पेट घेतला, बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण परिसरात धुराचा लाेट पसरला. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या घबराट पसरली. आगीच्या घटनेची खबर मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाल्या होत्या.