काजू बोर्डाच्या स्थापनेचा फायदा पुढील वर्षीपासून मिळणार

रत्नागिरी:- काजू प्रक्रिया आणि बी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने काजू बोर्ड तसेच काजू विकास मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली. हंगाम संपता संपता केलेल्या या घोषणेचा फायदा पुढल्या वर्षी बागायतदारांना मिळणार असल्याने शासनाच्या या घोषणा म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा असल्याच्या प्रतिक्रिया काजू उत्पादक शेतकर्‍यांतून उमटत आहेत.

काजू हंगाम संपताना काजूला मिळालेला दराने बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काजू हंगामाच्या सुरुवातीप्रमाणे हंगामाचा शेवट देखील कडूच झाला आहे. अंतिम टप्प्यातील काजू बी व्यापार्‍यांकडून कमी दराने म्हणजेच प्रतिकिलो केवळ 95 रुपयांनी बी ची खरेदी केली जात आहे. त्यामुळे काजूला मिळालेल्या दराने बागायतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यात यावर्षी काजू हंगाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला तेव्हा सुरुवातीला 110 ते 115 रुपयांनी काजू बीची खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू बी खरेदी केली जात होती. परंतु हंगाम सुरू झाल्यानंतर महिनाभरात काजू बी ची अपेक्षित आवक बाजारपेठेत झालेली नव्हती. त्यामुळे व्यापारी आणि कारखानदारांनी काजू बीच्या दरात किंचित वाढ केली. काजू बी प्रतिकिलो 120 ते 130 रुपयांनी खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र मार्चनंतर मोठ्या प्रमाणात काजू बी बाजारात उपलब्ध होऊ लागली. बाजारांमध्ये शेकडो टन काजू बीची आवक झाल्याने व्यापार्‍यांनी काजू बीचे दर पुन्हा कमी करण्यास सुरुवात केली. दर आठवड्यातला पाच ते दहा रुपयांनी दरात घसरण करीत काजू बीचा दर 105 ते 110 रुपयांवर स्थिर केला. दहा-बारा दिवसांनी त्याच दराने काजू बीची खरेदी केली जात होती. यात घसरण झाली आहे. सध्या व्यापारी अवघ्या 95 रुपये दराने काजू बीची खरेदी करीत आहेत.