कवी केशवसुत स्मारकाच्या अध्यक्षपदी गजानन पाटील यांची निवड

मालगुंड:- मराठी भाषेतील आद्य कवी आणि मालगुंड गावचे सुपुत्र कवी केशवसुत तथा कृष्णाजी केशव दामले यांच्या जन्म घराचे ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेने महाराष्ट्रातील भव्य असे कवी केशवसुत स्मारक उभारले. या कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झालेली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेची २८ वी सर्वसाधारण सभा नुकतीच कवी केशवसुत स्मारक मालगुंड ता. जि. रत्नागिरी याठिकाणी संपन्न झाली. या सभेसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळ, विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळासह विविध समिती प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या.

या सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार कोकण मराठी साहित्य परिषदेने साहित्यक्षेत्रात उभारलेल्या आणि कविश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी साहित्याची पंढरी म्हणून गौरविलेल्या कवी केशवसुत स्मारकाच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे सदस्य तथा सामाजिक क्षेत्रातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी स्मारकात कवी केशवसुतांचे जन्मभर, काव्य शिल्पे, काव्य दालन, वाचनालय, सभागृह, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ दालन असे साहित्यिक ठिकाणे आहेत. गजानन पाटील यांची यावेळी सभागृहांमध्ये सर्वानुमते आणि बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
यावेळी या सभेला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार अरुण नेरुरकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, नियामक मंडळाचे सदस्य आमदार संजय केळकर, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योती ठाकरे, शोभाताई सावंत, प्रा. अशोक ठाकूर, उषा परब, विश्वस्त रमेश कीर, विश्वस्त रेखाताई नार्वेकर, विश्वस्त तथा कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, कार्यवाह माधव अंकलगे यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ही निवड झाल्यानंतर श्री गजानन कमलाकर पाटील यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कविवर्य केशवसुत यांचे साहित्यिक कार्य आणि त्यांचे साहित्य सर्वदूर पोचविण्यासाठी तत्पर असून, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतानाच उर्वरित सर्व सुशोभीकरणाचे कामे पूर्ण करण्यावर माझा भर असेल. त्यासोबतच कवी केशवसूत स्मारकामध्ये भविष्यात अत्याधुनिक सोयीसुविधा उभारण्याचा माझा संकल्प असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गजानन पाटील यांनी यापूर्वी कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे दिवंगत अध्यक्ष अण्णा राजवाडकर यांनी सुरू केलेल्या अनेक संकल्पना तशाच पद्धतीने सुरू ठेवून त्यासह नवनवीन उपक्रम स्मारकाच्या माध्यमातून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी साठी उपलब्ध करून दिले आहे.
त्यांच्या निवडीने मालगुंड परिसरासह सर्वच साहित्य क्षेत्रात आणि त्यांच्या मित्रपरिवारासह सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गजानन कमलाकर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या निवडीने साहित्यिक क्षेत्रातील लोकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.