Wednesday, May 27, 2026
spot_img
Home संगमेश्वर कळंबस्ते येथे बागेला आग; रक्तचंदनासह आंबा-काजूची झाडे जळून खाक

कळंबस्ते येथे बागेला आग; रक्तचंदनासह आंबा-काजूची झाडे जळून खाक

अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा

संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबस्ते-भिमनगर येथे एका खाजगी फळबागेला अज्ञात इसमाने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मौल्यवान रक्तचंदनाची झाडे, आंबा आणि काजूच्या कलमांसह विविध प्रकारची सुमारे ३४० हून अधिक झाडे जळून खाक झाली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत सिद्धार्थ मोहिते (३९), जे सध्या मुंबई येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत आहेत, यांची कळंबस्ते-भिमनगर येथे सामाईक मालकीची बाग आहे. २९ मार्च रोजी दुपारी १:३० च्या सुमारास सर्व्हे नं. २०/१९ आणि २०/२१ मधील या बागेला आग लागली. ही आग कोणीतरी अज्ञात इसमाने जाणीवपूर्वक लावल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.

रक्तचंदन आणि श्वेत चंदनाची सुमारे १५० झाडे, वेगवेगळ्या जातीची १४० आंब्याची झाडे, शेवगा, काळीमिरी, आवळा, फणस, काजू, पेरू, रातांबी (कोकम) आणि चिकूची सुमारे ५० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

बागेचे प्रचंड नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर संकेत मोहिते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ३१ मार्च रोजी रात्री याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२६ (फ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

​कोकणात सध्या उष्णतेची लाट असतानाच, अशा प्रकारे बागांना आग लावण्याच्या घटनांमुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.