Sunday, November 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी करंजारी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

करंजारी येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील करंजारी येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात बाईक चालक गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती .

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार देवळे गावचे रहिवासी असलेले सलाउद्दीन हे त्यांच्या बाईकवरून (क्र. MH08 BM 7634) जात असताना, पाठीमागून येणाऱ्या फोर व्हीलरने (क्र. MH08 B 5016) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना सहा टाके पडले अशी प्राथमिक माहिती समोर आली. मात्र त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने आणि दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी व सीटी स्कॅन करण्यासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता.मिळालेल्या माहितीनुसार सलाउद्दीन यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले.

या दुर्घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि मदतीमुळे काही वेळातच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.